नागपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरु करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतीतील उद्योग पुन्हा सुरु करुन उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र, आरोग्य विभाग तसेच तत्सम संबधित विभागांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी डॉ. राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, ‘मेयो’चे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डी.एम. पंचभाई आदी यावेळी उपस्थित होते.
आगामी पावसाळयाचे दिवस लक्षात घेता शहरातील नाग नदीसह सर्व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाले तुंबणार नाहीत, यासाठी साफसफाईची कामे सुरु करण्यात यावी. आरोग्य विभागाने स्वच्छता व र्निजंतुकीकरण करावे व साथीचे आजार उदभवणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. कोराना विषाणूच्या प्रसाराबाबत सर्तकता बाळगतांना जनतेमध्ये जागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. अलगीकरण करुन वाढत असलेल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
‘लॉकडाऊन’मुळे महाराजबाग प्राणी संग्रहालय बंद आहे. येथील प्राण्यांच्या सुरक्षा व आरोग्यासाठी तसेच त्यांची सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनुदानाची निकड आहे. याबाबतचा प्रस्ताव पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. येथील प्राण्यांसाठी ‘दत्तक योजना’ राबविण्यात येत असून यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री.पंचभाई यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तुंची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही व किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी योग्य उपचार मिळत आहे. यासाठी आरोग्य व पोलिस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.