नागपूर : राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे.
विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान विधानपरिषदेचे सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, भाई जगताप, जयंत आसगावकर, राजेश राठोड, धीरज लिंगाडे, डॉ. प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर, सुनिल शिंदे यांनी एमपीएससी संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी एमपीएससीमार्फत होणारी पदभरती आणि पारदर्शकता व पेपरफुटीवरही प्रश्न विचारण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे देत मोठी घोषणा केली आहे.