शेगाव संस्थान येथे पारेषण सलग्न सौर विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन
महावितरण सोयगाव व उंद्री उपकेंद्राचे लोकार्पण
संस्थानच्या सोलर कुकींगला 1.5 कोटीचे अनुदान
बुलडाणा : राज्याच्या अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत राज्याने निश्चित केलेल्या 14 हजार 400 मेगावॅट वीज निर्मितीपैकी 12 हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य यशस्वी झाले आहे. अपांरपारिक उर्जेचा वापर वाढविण्यासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व शाळा , अंगणवाड्या , प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शेगाव येथील श्री. संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विहार येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण व श्री. गजानन महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या उंद्री व सोयगाव येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचेही लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. संजय कुटे, खासदार प्रतापराव जाधव, संस्थांनचे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. ॲड आकाश फुंडकर, जिल्हापरिषद अध्यक्षा सौ उमाताई तायडे, नगराध्यक्षा सौ शकुंतला बुच, संस्थानचे विश्वस्त पंकज शितुत, विश्वस्त गोविंदराव कलोरे, महानिर्मितीचे संचालक पुरूषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महा संचालक कांतीलाल उमाप, महावितरण मुख्य अभियंता अनिल डोये, श्रीश्री फाऊंडेशनचे संकेत बावनकुळे, अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, महाऊर्जाचे प्रादेशीक संचालक सारंग महाजन, अधिक्षक अभियंता राहुल बोरीकर, विनोद शिरसाट उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले की , 2035 पर्यंत देशातील सर्व वाहने ही वीजेवर चालणार असल्याने त्यादृष्टीने 35 हजार मे. वॅ. वीजनिर्मितीचे व ती वीज पारेषण करण्याची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात अपारंपरिक ऊर्जेचा मोठा सहभाग राहणार आहे. बुलडाणा जिल्हयात गत चार वर्षात 884 कोटींची वीजेची कामे करण्यात आली आहे. यात महावितरणचे 28 तर महापारेषणची चार उच्च दाबाची उपकेंद्रे व अनुशंघीक वीज जाळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हयात 1 हजार कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये नविन 40 उपकेंद्रे उभारण्यात येणार आहे. पुढील काळात जिल्हयातील 100 टक्के शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आणण्याचे नियोजन असून त्यासाठी जिल्हयातील नापिक, खडकाळ , ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संस्थानच्या सोलार कुकींग योजनेला 1 कोटी 50 लाखांचे अनुदान जाहीर करत लवकरच या योजनेचे उद्घाटनही करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच संस्थानमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे 3 मे. वॅ. पारेषण संलग्न विद्युत प्रकल्पाव्दारे 38 लाख युनिटची वीज निर्मिती केल्या जाते आणि संस्थानची ऊर्जेची गरच ही 50 लाख युनिटची आहे . त्यामुळे उर्वरित 12 लाख युनिटच्या वीज निर्मितीसाठी संस्थानने पन्नास टक्के वाटा उचलला तर 50 टक्के खर्च शासनाकडून करण्यात येईल असेही यावेळी उर्जामंत्री यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वीज, रस्ते, पीकाला चांगला भाव व रोजगाराची उपलब्धता असावी या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार ऊर्जा विभागाने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले. पूर्वी शेतकरी बांधवांना वीज जोडणी मिळण्यात अडथळे येत होते. ही प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात आली. त्यामुळे गत चार वर्षांत राज्यात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली.
पालकमंत्री डॉ. संजय कुटे यावेळी म्हणाले, जिल्हयात 2014 पुर्वी आणि नंतर झालेल्या वीज क्षेत्रातील फरक सर्वसामान्यांनाही दिसत आहे. ऊर्जा खात्याचे ऊर्जावान मंत्री श्री. बावनकुळे यांचेमुळेच हे शक्य आहे. जिल्हयातील सर्व शासकीय ईमारती सौरऊर्जेवर आणण्याचा संकल्प केला असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून नाविण्यपूर्ण अंतर्गत निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सोलर वर आधारीत कृषी रोहीत्र जास्तीत जास्त मंजूर करून जिल्ह्यातील शेतीमध्ये अपारंपारिक उर्जेचा वापर वाढवावा, अशी मागणीही यावेळी पालकमंत्र्यांनी केली. कार्यक्रमाला संस्थानचे विश्वस्त, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. भगत यांनी केले.
पारेषण संलग्न विद्युत प्रकल्पाची वैशिष्टये व जिल्ह्यातील लोकार्पण केलेल्या उपकेंद्रांची माहिती
·
ऑप्टीमायझीग टेक्नॉलॉजीवर आधारीत असल्याने एखाद्या भागावर सावली पडली तरी वीज निर्मिती थांबणार नाही.
• 2547 किलो वॅट क्षमता
• एकून खर्च 11 कोटी 70 लक्ष, 50 टक्के संस्थान 30 टक्के केंद्र सरकार व 20 टक्के राज्य सरकार
• 38 लक्ष युनिटची वीजनिर्मिती • मेंटनंन्सीची वॉरंटी 25 वर्ष
• ३३/११ केव्ही सोयगाव ता . बुलडाणा हे उपकेंद्र दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेत तयार करण्यात आले असून या उपकेंद्राची क्षमता 5 मेवॅ एवढी आहे. यासाठी 2 कोटी 42 लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. हे उपकेंद्रे कार्यान्वित झाल्याने धाड उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे तसेच परिसरातील 5 गावांना अखंडित वीजपुरवठा करण्याबरोबर त्यांच्या वीज समस्या निकाली काढण्यात आल्या आहे.
• ३३/११ केव्ही उंद्री ता. चिखली उपकेंद्राची स्थापीत क्षमता ५ मेवॅ असून यासाठी 2 कोटी 3 लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. या उपकेंद्रामुळे अमडापुर उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे. त्यामुळे या उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही तोरणवाडा गावठाण वीज वाहिनीची उभारणी करण्यात आल्याने परिसरातील 18 गावांच्या वीज समस्या निकाली निघाल्या आहेत.