नागपूर : नगर परिषदा, बसस्थानक, रेल्वे स्टेशन व बसस्टॉप या ठिकाणी नागरिकांची नेहमी गर्दी असते. संभाव्य वाढते उष्णतामान व उष्मालाटेबाबत सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयातून उपाय योजना कराव्यात. या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज असून तेथे पिण्याच्या पाण्यासाठी रांजण ठेवून शुध्द पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
उष्मालाटेपासून बचाव करण्याबाबत जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
एप्रिल व मे महिन्यात जिल्हयात दैनंदिन तापमानात वाढ होते. अतितीव्र तापमानात जिल्हा 13 व्या क्रमांकावर आहे. याबाबत आतापासून उष्मालाटेबाबत उपाय योजना करावी व उष्माघातपासून नागरिकांच्या बचावासाठी काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
सार्वजनिक कार्यालयात जेथे नागरिकांची ये-जा असते त्या ठिकाणी सावलीसाठी शेड तसेच ग्रीननेट लावावे. सर्व शासकीय रुग्णालयात या दृष्टीने उपचारासाठी काळजी घ्यावी. संबंधितांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाने मुलांच्या शाळा सकाळी ठेवाव्यात. पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी. विज पुरवठा नियमित ठेवावा. उन्हाळ्यात अनेक ठिकाणी आग लागण्याचा धोका असतो. अशावेळी अग्निशमन वाहने सुस्थितीत ठेवावे. फायर व ईलेक्ट्रीकल ऑडिट करुन घ्यावे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने उष्मालाटेबाबत ग्रामीण भागात मॉकड्रिलचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले.