उमरेड येथे रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम सुरु : पालकमंत्री
नागपूर उमरेड हे अंतर चौपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासात पूर्ण करता येणार असून या रस्त्याचे काम करताना रस्त्यावरील सर्व दिवे एलईडीच लावण्याच्या सूचना आपण देणार असून रस्त्याच्या बाजूला प्रशस्त बसस्टॉप, महिला-पुरुषांसाठी शौचालये आणि इलेक्ट्रिक चॅर्जिंग स्टेशन उभारण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
उमरेड येथे नागपूर उमरेड, उमरेड भिवापूर व अन्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कोट्यवधींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरिया, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आनंदराव राऊत, अस्तिकजी सहारे, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, जयप्रकाश वर्मा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले- 700 कोटींचा हा चार पदरी मार्ग असून नियोजित वेळेत या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. उमरेड भिवापूर या मार्गातही वन विभागाच्या काही अडचणी होत्या पण त्या आता दूर झाल्या आहेत. त्या कामाची सुरुवातही लवकरच होणार आहे. तसेच भंडारा गोंदिया यांना जोडणार्या अंभोरा पुलाचेही भूमिपूजन आज झाले. केबलवर हा पूल असून या पुलावर गॅलरी व दोन्ही बाजूंनी जिना राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना पुलावरून वैनगंगेचे दर्शन होईल. तसेच भंडारा गोंदियाला जाणार्या प्रवाशांसाठी हा शॉर्टकट रस्ता असेल.
उमरेडवरून जाणारा नागपूर नागभीड ही मीटरगेज रेल्वे लाईन आता पालकमंत्री बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी ब्रॉडगेज होत आहे. रेल्वे, वेकोलि आणि महाजेनको हे संयुक्तपणे ही रेल्वेलाईन करीत आहेत. वर्धाजवळ सिंदी येथे ब्रॉडगेज मेट्रोसाठी लागणार्या साहित्याचा कारखाना लवकरच सुरु होत आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच गोंदिया ते वर्धा व वर्धा ते रामटेक ही ब्रॉडगेज मेट्रो लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी नागपूर वडसा व्हाया उमरेडवरून जाणार आहे. 120 किमी प्रतितास हा वेग या गाडीचा राहणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
पालकमंत्री बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात नागपूर नागभीड या रेल्वे लाईनचे काम लवकरच सुरु होत असल्याचे सांगून येथील कोळसा खाण लक्षात घेता वीजनिर्मिती प्रकल्पही सुरु करण्याचा शासनाचा विचार आहे, असे सांगितले.
उमरेड या मतदारसंघाचा चौफेर विकास केवळ आ. सुधीर पारवे यांच्यामुळे होत असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले- जिल्ह्याची नियोजन समिती 776 कोटींची झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1600 किमीचे रस्ते ग्रामीण भागात होत आहेत. पालकमंत्री पांदन रस्तेही मोठ्या प्रमाणात होत आहे. याशिवाय पंतप्रधान रस्ते विकास योजनेत 1000 किमीचे रस्ते दुरुस्त होणार आहे. शेतकर्यांना वीज कनेक्शन देण्यात येत आहे. गावागावात 24 तास वीज पुरवठा आहे. भारनियमन कुठेही नाही. उपसा सिंचन योजनांची कामे सुरु आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होईल या दृष्टीने विकास सुरु आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आ. सुधीर पारवे यांचेही भाषण झाले. याच कार्यक्रमात पूरग्रस्तांना मदत करणारा व पुरातून अनेकांचे जीव वाचविणार्या अमित गजभियेचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. उमरेडमधील आशीर्वाद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उमरेडकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.