मुंबई: भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आमचा सिंहांचा पक्ष आहे, त्यामुळे हे लांडगे आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत.
विरोधकांनी हल्लाबोल यात्रा नव्हे, तर डल्ला मारो यात्रा काढली होती. भाजपाला नेहमीच ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच भविष्य आहे. संविधानात दिलेलं आरक्षण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे, तुमच्यासारखा रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता राज ठाकरेंना लक्ष्य केलं.
‘आम्ही चहा पितो. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच देतो,’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी पवारांना थेट इशाराही दिला. ‘पवारसाहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. 2014 मध्ये उडालेली धूळधाण लक्षात ठेवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवारांवर शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवरही त्यांनी टीका केली. आधी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल करत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.