मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार व उद्धव ठाकरे हेच असून ते आता कोणत्या तोंडाने बोंबा मारत आहेत, असा थेट आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, ” महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करून सामाजिक वातावरण बिघडवत ठेवण्याचा उद्योग पवार व ठाकरे करत आहेत.
नागपूर येथे पत्रकारांना त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारचा मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत कुठलाही संबंध नाही. उलट शरद पवार अनेक वर्षे सत्तेत होते. मुख्यमंत्री होते. मात्र त्यांची भूमिका मराठा आरक्षण विरोधात आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला सवलती दिल्या नाहीत. आता ते याविषयी बोलतात हे आश्वर्य आहे. इतकेच नव्हे तर, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांचे महाविकास आघाडीचे सरकार मराठा आरक्षणाचा खटला योग्यरित्या कोर्टात लढला नाही. चांगले वकील लावले नाहीत. ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले. आता ते कोणत्या अधिकाराने बोंबा मारत आहे. पवार व ठाकरे यांना मराठा समाजातील नेत्यांनी, युवकांनी प्रश्न करावा की, तुम्ही आरक्षण का दिले नाही आणि, मिळालेले आरक्षण कोर्टात का गमावले?
विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढा!
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला लोक कंटाळले असून त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय कामे केली हे जनतेला सांगावे. सकाळचा राजकीय भोंगा न वाजविता शेतकरी, शेतमजुरांना न्याय मिळवून द्यावा. विधानसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवावी. ठाकरे यांची भूमिका हिंदुत्व विरोधी आहे, त्यामुळेच त्यांना मुस्लिम मते मिळाली. हे महाराष्ट्राला माहिती झाल्यानेच मुंबई व कोकणातील सामान्य माणुसही उद्धव ठाकरेंसोबत नाही. उद्धव ठाकरे कॉंग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढविण्याचे काम करीत आहेत, उद्धव ठाकरे यांनी आत्मपरिक्षण करावे असेही बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसने साडेआठ हजार रुपये द्यावे
महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे व रोहित पवारांना यांना तर कॉंग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार झाले आहे. मविआने खोटे आश्वासन देऊन मते घेतली. पंतप्रधाम नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहे, आदिवासी समाजाचे हक्क काढणार असा अपप्रचार केला. त्यांनी जनतेची माफी मागावी. ज्या ठिकाणी मविआचे खासदार निवडून आले आहेत, त्या ठिकाणी मतदारांना साडेआठ हजार रुपये द्यावेत, अन्यथा लोक त्यांच्या घरासमोर रांगा लावतील. असेही ते म्हणाले.
२४ मुख्य पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ
केंद्र सरकारने १४ मुख्य पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला व सोयाबीनला चांगला भाव मिळेल. या निर्णयासाठी केंद्र सरकारचे आभार. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एमएसपीमध्ये सहयोग करावा अशी विनंती केली आहे. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.