नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अनेक जणांना ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड असल्याची शंका आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याच्या आरोप महाविकास आघाडीतील अनेक पराभूत नेत्यांनी केला. आघाडीच्या एकूण २७ उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
या सर्वांच्या याचिका दाखल करून घेण्यात आल्या आहेत. यामध्ये माजीमंत्री यशोमती ठाकूर, वसंत पुरके, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजीमंत्री रमेश बंग, माजीमंत्री राजेंद्र शिंगणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, गिरीश पांडव आदींचा समावेश आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत याचिका दाखल करता येते. त्यानुसार सात जानेवारी ही याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख होती. याचिक दाखल करणाऱ्यांची सांख्या आता २७ झाली.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. तसेच विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात त्यांचा दावा फोल ठरला आणि महायुतीला बहुमत मिळाले. आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. काँग्रेसचे फक्त १६ , शिवसेना (उबाठा) २१, राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे १० आमदार निवडून आले आहेत. विदर्भातील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. या सर्वांनी ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही असा दावा याचिकेच्या माध्यमातून केला आहे.
विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोटाळ्याचे आरोप –
ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने काढले नाही, निकालानंतर पराभूत उमेदवारांना सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही. माहिती अधिकार कायद्यांतंर्गत ही माहिती देणे बंधनकारक असूनही आमचे हक्क डावलल्या जात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. या सर्व याचिका स्वतंत्रपणे ॲड. आकाश मून, ॲड. ऋग्वेद ढोरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आल्या आहेत.
‘या’ उमेदवारांकडून याचिका दाखल –
दक्षिण-पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, तुमसरचे पवार गटाचे चरण वाघमारे , माजी मंत्री वसंत पुरके, पवार गटाचे सलील देशमुख, रमेशचंद्र बंग, अकोला जिल्ह्यातील आकोट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. महेश गणगणे या उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे.