नागपूर:कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थान मंदिरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंदिर प्रशासनाच्या जवळपास 25 ते 30 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.बाधितांना जवळच्या नंदिनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यातील काही कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ समोर आला असून सर्व कर्मचारी रुग्णालयाच्या बेडवर गंभीर अवस्थेत दिसत आहेत. मात्र कोराडी मंदिर प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले.
माहितीनूसार एकीकडे शहारात चैत्र नवरात्रील सुरुवात झाली असून कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदीरात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.
आज दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या सुमारास मंदिरात जेवणानंतर कर्मचाऱ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. शिंगड्याच्या पिठापासून बनलेल्या पदार्थापासून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तब्बल 30 च्या जवळपास कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून मंदिर प्रशासनाकडून या घटनेसंदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही.