येरखेडा नाल्याच्या पुलावरील घटना
कामठी: येथील शहरातून जाणा-या नागपूर जबलपूर मार्गावरील लाॅकडाउन पूर्वी तयार झालेल्या स्टेट बॅंक जवळील येरखेडा नाल्याच्या पुलावरून जडवाहनांची ये-जा सुरू झाल्याने अवघ्या दिड महिन्यातच या पुलावरील काही भागाला तडे गेल्याने पुलावर दुर्घटना होण्याची शक्यता बळावली असून हे स्थळ अपघाती मृत्यूस निमंत्रक ठरत आहे.तसेच चंपाश्रम समोरून गेलेला रस्ता हा निमुळता झाल्याने रहदारीस अडथळा होत असल्याने या मार्गावर अपघाताची घटना नाकारता येत नाही तसेच हा रस्ता गुणवत्तापूर्ण आहे काय? हे तपासणे गरजेचे असल्याची मागणी जागरूक नागरिक डॉ संदीप कश्यप, प्रमेन्द्र यादव, लालू यादव यासारख्या बहुतांश जागरूक नागरिकांनी केली आहे.
देशात सर्वत्र सिमेंटीकरण रस्त्याचे कामे मोठया प्रमाणात सुरू असून शहरातील या रस्त्यांचे बांधकाम कुंडू कन्स्ट्रक्शन कंपनी (केसीसी) ला देण्यात आले आहे. लाॅक डाउन पूर्वी जुने पुल तोडून घाई गडबडीत तकलादू पध्दतीने नविन पुल तयार करण्यात आला. मात्र मुदतीपूर्वीच या मार्गावरून जड वाहनांना ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे या पुलाचे पिल्लरला धोका निर्माण झाल्याने शनिवारला हा मार्ग अर्धा ते एक फिट एका बाजुने खाली गेल्याने
या मार्गावरून एका बाजूला कठडे लावण्यात येवून वाहनांची येे-जा वळती करण्यात आली. जरी या मार्गाचे कंत्राटदाराकडून दुरूस्ती करण्यात येणार असली तरी भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाचे बांधकाम हे अगदी थोडयात दिवसात झाले असल्यामुळे या रस्त्याची गुणवत्ता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत छावणी परिषदेचे माजी नगरसेवक पेमेंन्द्र यादव , डॉ संदीप कश्यप, लालू यादव यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणा-या केसीसी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संदीप कांबळे कामठी