पुणे/मुंबई : प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. रुग्णालयात नेतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे आई किरण, पत्नी, मुलगा आणि बहीण, असा परिवार आहे.
शनिवारी सकाळी १०.३० वाजता काळबादेवी (मुंबई) येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रे आणि कंपनीच्या संकेतस्थळावरून मिळाली.
बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जन्म १८ मे १९७७ रोजी मुंबईत झाला. त्यांनी पदवीचे शिक्षण हसाराम रुजुमल कॉलेज आॅफ कॉमर्स अॅँड इकॉनॉमिक्स येथून घेतले. पदव्युत्तर शिक्षण एस. पी. जैन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अॅँड रिसर्च, मुंबई येथे झाले. तसेच २०१३ मध्ये हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये ओनर प्रेसिडेंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये १९९९ मध्ये त्यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून करिअरला सुरुवात केली. रांजणगाव येथे २००१ मध्ये कंपनीचा प्लांट उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
त्यानंतर २००५ मध्ये त्यांना जनरल मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या गुणवत्तेवरून त्यांची बजाज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रसिद्ध गायक जस्टीन वेबर याच्यासोबत बजाजला लाईटनिंग पार्टनर म्हणून आणण्यात बजाज यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर प्रो कबड्डी, बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ स्पोर्ट क्लायंबिंग यांच्याशीही बजाज इलेक्ट्रिकल्सला त्यांनी प्रायोजक म्हणून जोडले होते.