मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला विश्वास
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू, असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जाहीर केलेली मानधन वाढ द्यावी, सेवा निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद, कामावरील वेळेची मर्यादा या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मंत्री पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण तत्पर असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
बहुसंख्य अंगणवाडी सेविका, मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत. मानधन हे कुटुंबासाठी खर्च होत असल्याने भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाहीत. त्यामुळे वृद्धापकाळात औषधोपचाराचा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांना एक हजार ५०० रूपये, मदतनिसांना ७५० रूपये आणि मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रूपये मानधन वाढ जाहीर केली आहे, ती वाढ लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असून लवकरच हे वाढीव मानधन मिळेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.
यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, शुभांगी पालशेतकर आदी उपस्थित होते.