नागपूर:शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले मी आणि अनिल देशमुख यांनी नागपूरमुळेच अनेक दिवस तुरुंगात काढले.
पत्रकारांनी अनिल देशमुख यांना भेटण्याचे कारण विचारले असता संजय राऊत म्हणाले, “आमची भेट कुठे झाली हे तुम्हाला माहीत आहे. अनिल देशमुख माझा मित्र आहे. ज्या परिस्थितीत आम्ही आमचे दिवस घालवले ते खूप कठीण होते. तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता. नागपूरमुळे आम्ही इतके दिवस तुरुंगात काढले, हे सर्वांना माहीत आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबाबत विचारले असता अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. मात्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर केल्या नाहीत. महाराष्ट्रातही निवडणुका होतील असे वाटत होते, मात्र दोनच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या. ते म्हणाले की, मला समजत नाही की भाजप निवडणुकीला का घाबरतो?
जागावाटपाच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले की, विदर्भात महाविकास आघाडी 50 ते 55 जागा जिंकेल, असे वातावरण आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली असून, जागांसाठी एकमेकांचे पाय खेचू नका, असे तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सांगितले असून, किती जागा घ्यायच्या याचा निर्णय एकत्रित बैठकीत घेतला जाईल, असेही राऊत म्हणाले.