नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू होती. मात्र, यावर अधिकृतपणे कोणताही आघाडीचा नेता स्पष्ट उत्तर देण्यास तयार नाही. पक्ष जे आदेश देईल ते करू, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पाटील म्हणाले की, ती जागा सध्या आमच्याकडे नाही, मात्र ती जागा युतीत मिळाल्यास आमच्याकडे उमेदवार तयार असल्याचे विधान पाटील यांनी केले.त्यामुळे हा उमेदवार नेमका कोण ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
शिवस्वराज यात्रेसाठी जयंत पाटील मंगळवारी नागपुरात पोहोचले होते. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा जागेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले, “प्रथम ती जागा युतीत मिळायला हवी. जागा मिळाल्यास आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ,असे ते म्हणाले.
नागपूर शहरातील जागांच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, शहरातील काही जागांवर आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आघाडी काही जागांची मागणी करत आहे. पहिला क्रमांक पूर्व नागपूर आणि दुसरा दक्षिण-पश्चिम नागपूर आहे.
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज यात्रा विदर्भात पोहोचली-
राज्यात सुरू झालेल्या शिवस्वराज यात्रेबाबत बोलताना पाटील म्हणाले, आज ही यात्रा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात मुक्काम करणार आहे. त्यानंतर बुधवारी ही यात्रा नागपूर जिल्ह्याला भेट देणार असून त्यात काटोल विधानसभेचाही समावेश आहे. यासोबतच ही यात्रा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही यात्रा जाईल. तर अहेरीमध्ये गणेशोत्सव संपल्यानंतर यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील म्हणाले.