नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘अण्णा गँग’च्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅंगविरोधात तक्रार देण्यासाठी दहशतीमुळे एकही नागरिक समोर येत नसताना पोलीस दलातील दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अण्णा गँगवर कारवाई करत सर्व गुंडांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे दहशतमध्ये असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गिट्टाखदानमधील पंचशीलनगर चौकात बसून टोळीतील गुंड दहशत निर्माण करायचे. महिलांची छेड काढणे, लहान मुलांना शिवीगाळ करणे , शुल्लक कारणांवरून लोकांना मारहाण करणे, दुकानांची तोडफोड करणे अशा घटना याठिकाणी दररोज घडत होत्या. १३ मे रोजी या गॅंगने चौकातच राडा घालण्यास सुरुवात केली. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस उपायुक्त गुन्हे मुमक्का सुदर्शन व परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल मदने यांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली.
पोलिसांच्या कारवाईनंतर लगेचच गॅंगमधील सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात सुधीर विल्सन, संदीप अण्णा, यश अण्णा, आशीष मॉरिस विल्सन, लक्की विजय यादव, मनिष उर्फ लक्की गुरू पिल्ले व मिथिलेश उर्फ बल्लू लक्ष्मीनारा यांचा समावेश होता. यातील संदीप, आशीष, मिथिलेश व मनिष यांना त्वरित अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे.