Published On : Mon, Apr 20th, 2020

सतरंजीपु-यातील ‘त्या’ रुग्णांने केले आणखी ६ लोकांना कोरोना बाधित

Advertisement

खरी माहिती पुरविण्याचे मनपा आयुक्तांचे नागरिकांना भावनिक आवाहन

नागपूर : कोविड-१९पासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याचे पालन न केल्याने किती मोठा धोका निर्माण होउ शकतो याची प्रचिती नागपुरातील सद्यस्थिती पाहता येते. वारंवार आवाहन करूनही मनपाच्या विलगीकरण कक्षात येण्यास तयार न झाल्याने व स्वत:मधील लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज शहरातील जवळपास २०० लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. सतरंजीपुरा परिसरात आढळलेला आणि मृत्यू पावलेला कोरोनाग्रस्त रुग्ण आज शहरातील १९९ लोकांच्या कोरोना संसर्गाचे कारण ठरू शकतो अशी स्थिती आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट होताच या १९९ जणांना मनपाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४४ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १४४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. स्वत:सह इतरांचा जीव वाचविण्यासाठी मनपाच्या सर्वेक्षण चमूला योग्य आणि खरी माहिती द्या, असे भावनिक आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केले आहे.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg - 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासंदर्भात माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सोमवारी (ता.२०) आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने नागपुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला अजून जास्त सावधगिरी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे ४०० ते एक हजार लोकांना संसर्ग पसरू शकतो, ही वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाची बाब आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांशी एकाच कुटुंबाची पार्श्वभूमी जुळली आहे. पाच एप्रिलला शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू झाला. या व्यक्तीच्याच संपर्कात आलेल्या किंवा त्याच्या परिवारातील सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व पॉझिटिव्ह आहेत.

सतरंजीपुरा परिसरातील ‘त्या’ वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने जलद कार्यवाही सुरू केली. सुरूवातीला या कोरोनाग्रस्त इसमाच्या संपर्कातील त्याच्या परिवारातील तीन मुली, मुलगा, जावई, सुन, नातवंड अशा २२ सदस्यांचे मनपाच्या ‘कोरोना केअर सेंटर’मध्ये विलगीकरण करण्यात आले. याशिवाय किराणा सामान, डॉक्टर, औषध दुकान आणि यासह ज्या अन्य ठिकाणी ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचा व त्याच्या परिवारातील सदस्यांचा संपर्क आला. अशा सर्व ठिकाणच्या १९ लोकांचेही मनपाद्वारे विलगीकरण करण्यात आले. या १९ जणांपैकी आठ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला व एकाचा अहवाल पॉजीटिव्ह आला तर १० अहवाल प्रतीक्षेत आहेत. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या दोन सहका-यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्या सहका-यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र दुस-या अहवालात एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. आता सदर डॉक्टरकडे मागील १४ दिवसात येणा-या रुग्णांची माहिती घेउन त्यांनाही मनपाच्या विलगीकरण कक्षात आणण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त या व्यक्तीच्या आजारपणात अनेक नातलग आणि शेजारी भेटायला आले. यांची संख्या ४९ आहे. असे एकूण ‘त्या’ रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या ८९ व्यक्ती शोधण्यात आल्या असून त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ८९ व्यक्तींपैकीच ४२ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकंदरीत नागपुरात एका रुग्णामुळे वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मनपाची टिम घरोघरी जाउन सर्वे करून लोकांची माहिती घेत आहे. सतरंजीपुरा भागातील ‘त्या’ रुग्णाने व त्याच्या परिवारातील सदस्याने वेळेवर योग्य माहिती दिली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती. मात्र अयोग्य माहिती, अपूर्ण माहिती दिल्यामुळे आज या एका रुग्णामुळे शहरातील १९९ लोक त्यांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ४४ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर १४४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

काही लक्षणे आढळल्यास किंवा सतरंजीपुरा येथील ‘त्या’ रुग्णाच्या व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांशी कुणाचा संपर्क आला असल्यास त्याची माहिती त्वरीत मनपाला द्या. मनपाच्या नियंत्रण कक्षाद्वारे आपल्याला आवश्यक मदत केली जाईल. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी वेळीच तपासणी होणे आवश्यक आहे. आज शहरात ७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ६० जणांवर उपचार सुरू आहे तर इतर १४ पूर्णपणे बरे झाले आहेत. शहरातून निघणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आधीच विलगीकरण कक्षात ठेवले आहेत. रुग्ण आढळताच वेळीच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हे सर्व वेळेत होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रशासन आणि समाजाला सहकार्य करा, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मनपाच्या सर्वेक्षण चमूला सहकार्य करा
शहरात ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते क्षेत्र मनपातर्फे प्रतिबंधित करून सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत मनपाद्वारे एकूण नउ क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत. यापैकी चार क्षेत्रांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ दिवस मनपाच्या चमूद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून या चार क्षेत्रामध्ये कोणताही रुग्ण संशयीत आढळला नाही. सद्यस्थिती पाच क्षेत्र प्रतिबंधित असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील लोकांना बाहेर जाउ दिले जात नाही व बाहेरील लोकांनाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश देण्यात येत नाही. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या दिवसापासून मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे १४ दिवस सर्वेक्षण केले जाते. पाच झोनमध्ये २४ डॉक्टरांसह २७१ चमू कार्यरत आहेत. या चमूंद्वारे दररोज सुमारे १९४४३ घरांमधील ८१०६१ लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्दी, ताप, खोकला यासह अन्य लक्षण आणि प्रवासाची माहिती या सर्वेक्षणात घेतली जाते. पाच झोनमधील लक्षणे आढळलेल्या १८७ जणांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपाची आरोग्य चमू जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. नागरिकांनीही या चमूला योग्य आणि अचूक माहिती देउन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Advertisement
Advertisement