मुंबई: ‘अनुपमा’ या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी बुधवारी (ता. १ मे) भाजपात प्रवेश केला. दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली गांगुली यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विकासाचा महायज्ञ सुरू असताना त्यात सामील होण्याचा मी निर्णय घेतला आहे. मला यानिमित्ताने सर्व चाहत्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा हवा आहे. मी योग्य तो निर्णय भविष्यात घेईल, असे रुपाली म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनानंतर मी भाजपाच प्रवेश करत आहे. भाजपातील सर्व नेत्यांना एकदिवशी माझा अभिमान वाटेल, असे काम करून दाखवेल, असेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रचार करण्याची शक्यता-
पश्चिम बंगालमध्ये ४२ लोकसभा मतदारसंघासाठी सर्व सात टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यात सहा मतदारसंघात मतदान झाले. त्यानंतर उरलेल्या टप्प्यात अधिकाधिक मतदारसंघ आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या उमेदवाराचा तृणमूल काँग्रेससोबत चुरशीचा सामना रंगेल. याच पार्श्वभूमीवर रुपाली यांचा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यामुळे प्रचारात उतरू शकतात, असे बोलले जात आहे.