नागपूर: सरकारच्या धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध कर्मचाऱ्यांचा असलेला संताप, अधिवेशनाच्या कालावधीमध्ये निष्क्रिय निघालेले सरकार आणि शेतकऱ्यांच्याप्रती असलेले सरकारचे विरोधी धोरण, राज्यात निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्था यासर्व बाबी येत्या काही दिवसामध्ये कशापध्दतीने मांडल्या जाव्यात याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली.
संघटनात्मक बाबींचाही या बैठकीमध्ये विचार झाला शिवाय गुजरातच्या निकालाने देशातील राजकीय ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेला वेग येवू शकतो. त्यादृष्टीने संघटनेचा पायाभूत विस्तार अधिक मजबुत करावा अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली.
गुजरातच्या निकालाने भारतीय राजकारणात बदल होवू शकतो. २०१९ ला देशातील जनता पर्यायी विचार करु शकते हे गुजरातच्या निकालाने असा संदेश भारतीय राजकारणाला दिला आहे. भाजपाच्या विरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. एका बाजुला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजुला जनशक्ती आहे. जनशक्ती ही जर एकवटायची असेल तर त्याला समविचारी पक्षांची मोट एकत्रित बांधण्याची गरज आहे. काँग्रेसने याकामात पुढाकार घ्यावा हे अत्यंत आवश्यक आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका सरकारने घेतला हे आपल्या आंदोलनाचे यश आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व आमदारांचे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले. आत्ता नुसते थांबायचे नाही तर यापुढे पक्षाच्यावतीने आणखी आंदोलने करण्याची घोषणा सुनिल तटकरे यांनी यावेळी केली.
या बैठकीमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनामध्ये बोंडअळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत करावी अशी सरकारला अल्टीमेंटम दिली असल्याचे सांगतानाच तुडतुडयांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या तिजोरीतून मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांसाठी काही करताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक आक्रमक होवून सरकारला जाब विचारावा असे सांगितले.
अधिवेशनामध्ये राज्यातील सर्वच विभागांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवून मागणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी जाहीर केले.विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने जसा सरकारवर हल्लाबोल केला तसाच भविष्यात मराठवाडयातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारविरोधी हल्लाबोल करण्याची तयारी पक्षाने करावी असेही सांगितले.
या बैठकीमध्ये आमदार जगन्नाथ शिंदे हे ऑल इंडिया ड्रगिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या बैठकीच्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यावर काढण्यात आलेल्या ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाची संकल्पना आमदार वैभवराव पिचड आणि आमदार निरंजन डावखरे यांची आहे.
या बैठकीला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद हेंमत टकले आदी उपस्थित होते.याशिवाय पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.