Published On : Tue, Jun 15th, 2021

गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी सुयोग्य समन्वय साधावा-जयंत पाटील

Advertisement

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत आंतरराज्यीय यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा. त्यामुळे पूरनियंत्रणास मदत होईल, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.

गतवर्षी आलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी करण्यात येणाऱ्या पूरनियंत्रण कार्यक्रमाबाबतच्या मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, खासदार सर्वश्री प्रफुल्ल पटेल, कृपाल तुमाने, सुनिल मेंढे उपस्थित होते. तर भंडारा येथे जिल्हाधिकारी संदीप कदम, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपजिल्हाधिकारी अर्चना पोळ व अभिषेक नामदास हे उपस्थित होते.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गतवर्षीसारखी पूरपरिस्थिती या वर्षी निर्माण होऊ नये याकरिता जलसंपदा विभाग तसेच महसूल यंत्रणेने समन्वय साधावा. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेले पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न संबंधित जिल्हाधिकारी यांनी आमदार महोदयांशी चर्चा करुन ते सोडविण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. तसेच या बैठकीत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत 22 जून रोजी मुंबई येथे सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी – मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसीखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच विभागाने 116 नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पुर्ण होत आली आहे. त्यातून 40 बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपती काळात प्रशिक्षित टिम तालुकास्तरावर ठेवण्याबाबतची सूचना चांगली असल्याचे ते म्हणाले.

योग्य समन्वय आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्वाच्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने मेडीगड प्रकल्प, संजय सरोवर तसेच तेलगंणा राज्याच्या धरणातील पाणी सोडताना व थांबविताना आपल्या राज्याच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ज्यामुळे व्यवस्थित नियोजन करता येईल. गतवर्षीसारख्या अडचणी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पूनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करुन हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल, असे सांगितले. खासदार कृपाल तूमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्या वेळी झालेले नुकसान पाहता तात्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशी सूचना केली.

आमदार सर्वश्री नाना पटोले, ॲड.आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड.अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन, अडीअडचणी याबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वयक) तथा कृष्णा खोरे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement