नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी शहरात नागपूर मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी 12 आणि1 वाजताच्या सुमारास काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राजवळ लावलेल्या त्यांच्या टेबलवरून मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक,खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी कागदी स्लिप दिली. त्या स्लिपवर नितीन गडकरी आणि भाजपचा निवडणूक चिन्ह होते.
तसेच नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ घोषणाही लिहिलेली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपवर केला.मात्र हा प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडकरींचा फोटो आणि भाजपचा निवडणूक चिन्ह छापून देणारी मशीन तिथून हटवण्यास सांगितले. यावरुन दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला. तसेच यातील संतप्त काँग्रेसचा एक कार्यकर्त्याने ही मशीन फोडल्याची माहितीही पुढे आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणणायचे प्रयत्न केल्यानंतर वाद शांत झाला.