Published On : Wed, Jul 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विधानसभेत आजही वादंग ; फडणवीस-पटोलेंमध्ये खडाजंगी, विरोधकांकडून सभात्याग

Advertisement

मुंबई : राज्यात विधिमंडळ अधिवेशन सुरु असून आजही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादंग पाहायला मिळाले. सभागृहात आज इगतपुरीमधील एका गरोदर आदिवासी महिलेच्या मृत्यूचा मुद्दा अधिवेशनात चर्चेत आला यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला.

काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याच्या मुद्द्यावर चर्चेसाठी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. “इगतपुरीच्या सोनेवाडी गावात आदिवासी गरोदर महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यातून ती इगतपुरीच्या दवाखान्यात पोहोचली असता तिथे डॉक्टरच उपस्थित नव्हते. त्यानंतर ती गरोदर महिला वाडीवरे गावात गेली. तिथे तिची प्रकृती खालावली अखेर तिचा मृत्यू झाला. महाराष्ट्र हा प्रगतिशील राज्य आहे. मात्र तरी देखील एक आदिवासी महिला फक्त उपचार न मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडते दुर्देवच म्हणावे लागेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

तर सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका आदिवासी गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. हे आपल्याला भूषणावह नाही, असे नाना पटोले म्हणाले. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून देवेंद्र फडणवीसांनीही त्यावर परखड भूमिका मांडली. या मुद्द्याची गंभीरता लक्षात घेता निवेदन करण्यात येईल. खरंतर राजकीयच बोलायचे झाले , तर हे किती वर्षं होते सत्तेमध्ये? असा उलट सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. जर गांभीर्याने चर्चा करायची असेल, तर सरकार यावर निवेदन करेल. त्यात काही कमतरता असेल, तर सरकार चर्चा करायलाही सरकार तयार आहे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीस यांच्या भूमिकेमुळे समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला आहे.

Advertisement