मुंबई :भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकले. त्यानंतर सर्व स्तरावरून क्रिकेट संघातील खेळाडूचे कौतुक करण्यात येत. महाराष्ट्राच्या विधीमंडळात मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सरकारी तिजोरीतून ११ कोटींचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
यावर बोलताना विधानसेभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. क्रिकेट संघ मुंबईत दाखल झाल्यानंतर लाखोंच्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी,असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
क्रिकेटपटूंना आधीच खूप पैसे मिळाले आहेत. क्रिकेटपटू पैशांसाठी नाही तर देशासाठी खेळतात, मग त्यांना पैसे का देता ? असाही सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.क्रिकेट खेळाडूंना बीसीसीआयने १२५ कोटी दिले आहेत, तरीही सरकारी तिजोरीतून पैसे देण्याची गरज नव्हती. मात्र स्वतःची पाठ थोपटवून घेण्यासाठी हे बक्षीस दिले गेले. गरीब मेला तरी चालेल पण सरकारला थाप मिळाली पाहीजे,असा घणाघातही वडेट्टीवार यांनी केला.