मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याचवेळी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली.
या भेटीदरम्यान अनेक घडामोडी घडल्याच्या पाहायला मिळाल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला. परंतु एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातला व्हिडीओही समोर आला आहे.
अर्थसंकल्प आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जाताना दिसत आहेत. तर वाटेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे दिसत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याजवळ आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवेंशी हस्तांदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडासा हास्यविनोदही झाला. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मागून येत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी समोर उद्धव ठाकरे असल्याचे दिसताच त्यांना न पाहिल्यासारखं करून तिथून हळूच निघून गेल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.