नागपूर महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकारी अधिकारी म्हणून कार्य करीत असताना प्रामाणिकपणे कार्य केले. दिलेली जबाबदारी पार पाडली. महानगरपालिका माझी पालक आहे. या संस्थेच्या मी सदैव ऋणात राहू इच्छितो, असे भावपूर्ण उद्गार सेवानिवृत्त होत असलेले जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी काढले.
नागपूर महानगरपालिका आणि अधिकारी, कर्मचारी वृंदातर्फे २८ मे रोजी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती समारोहात जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर सेवानिवृत्त विभागीय परिवहन अधिकारी शरद जिचकार, क्रीडा सभापती नागेश सहारे, महागायक अभिजीत कोसंबी, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका वंदना भगत, उज्ज्वला बनकर, कार्यकारी अभियंता राजेश राहाटे, मंत्रालयातील महसूल विभागाचे कक्ष अधिकारी शरद ढोके, अभियंता कल्पना मेश्राम, भंते नागाप्रकाश, कामगार नेते राजेश हाथीबेड, पत्रकार रवि गजभिये आदी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त विभागीय परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या हस्ते जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. अशोक कोल्हटकर यांनी दिलेली सेवा ही मोलाची आहे. अधिकारी असले तरी त्यांनी आपल्यातला कार्यकर्ता संपू दिला नाही. हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन श्री. शरद जिचकार यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले.