Published On : Thu, Apr 12th, 2018

‘अस्मिता’ योजना शहरी भागातही राबविणार – पंकजा मुंडे

Advertisement

नाशिक : ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील शाळांमध्येदेखील अस्मिता योजना राबविण्यात येईल आणि यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करण्यात येईल. तसेच योजनेअंतर्गत सॅनिटरी पॅडची किंमत शून्यापर्यंत खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ईदगाह मैदान येथे आयोजित ‘अस्मिता’ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जि.प. सभापती मनीषा पवार, अपर्णा खोसकर, मनीषा पवार, सुनिता चारोस्कर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार आदी उपस्थित होते.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्रीमती मुंडे म्हणाल्या, स्वीकारार्हता, परवडणारी किंमत आणि उपलब्धता या तीन तत्वांवर ही योजना राबविण्यात येणार आहे. सॅनिटरी पॅडचे एकाच ठिकाणी उत्पादन करून बचत गटांच्या माध्यमातून ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. बचत गटांना सुमतीबाई सुकळीकर योजनेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल आणि बचत गटाच्या माध्यमातून अशिक्षित महिलादेखील सक्षम आणि संघटित होतील.

मुलींचे पोषण आणि चांगले आरोग्य राहिल्याशिवाय सशक्त पिढी जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे ही योजना शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचविण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जनजागृती आणि सॅनिटरी पॅडच्या उपलब्धतेवर भर देण्यात येत आहे. उपलब्धता अधिक असल्यास किंमतदेखील कमी होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अक्षय कुमार यांनी ‘अस्मिता फंड’ ला योगदान दिले आहे. असे समाजातून योगदान मिळाल्यास संपूर्ण राज्य ‘अस्मिता राज्य’ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अस्मिता योजनेमुळे आदिवासी पाड्यावरील मुलीदेखील आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगू शकतील आणि याच मुली अस्मितेचा दूत बनून गावागावात माहिती पोहोचवतील, असे त्यांनी सांगितले. त्यांनी योजनेविषयी मोकळेपणाने आणि धीटपणे विचार मांडणाऱ्या मुक्ता बेंडकुळे हिचे कौतुक केले. तसेच नाशिक जिल्ह्याने अस्मिता योजनेअंतर्गत चांगली कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले.

श्री.भुसे म्हणाले, अत्यंत कमी खर्चात महिलांच्या आरोग्याची समस्या सोडविणारी योजना शासनाने सुरू केली आहे. अस्मिता योजनेअंतर्गत बचत गटांची नोंदणी करण्यात येत आहे. बचत गटांच्या माध्यमातून ही योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. इंटेन्सिव्ह जिल्हा म्हणून शासनाने घोषित केल्याने कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या बचत गटांकडून व्याजाची रक्कम घेण्यात येणार नाही.

ग्रामविकास विभागातर्फे 2011 च्या पूर्वीचे गावठाणावरील अतिक्रम नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घराच्या उताऱ्यावर पुरुषासोबत घरातील महिलेचेही नाव लावण्याचा निर्णयदेखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीमती सांगळे यांनी सॅनिटरी नॅपकीन कमी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी त्याची किंमत जिल्हा परिषदेतर्फे अदा करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती फरांदे यांनी अस्मिता योजनेमुळे मुली आणि महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, महिलांना या योजनेमुळे त्यांचा हक्क मिळाला आहे. राज्यात केवळ 17 टक्के महिला सॅनिटरी नॅपकीनचा उपयोग करत असल्याने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने ही क्रांतिकारी योजना सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.गुप्ता यांनी राज्यात अस्मिता नोंदणी तीन कोटीपर्यंत नेण्याचे प्रयत्न असल्याचे सांगितले. प्रत्येक घरापर्यंत ही माहिती पोहाचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात श्री.गिते यांनी अस्मिता योजनेअंतर्गत जिल्ह्यात 650 बचत गट आणि 25 हजार मुलींची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती दिली. नोंदणीत नाशिक जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते दहा मुलींना प्रातिनिधीक स्वरुपात अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते ‘अस्मिता-स्वच्छता व आरोग्याचा आयाम’ आणि ‘विकास प्रेरणा’ या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यमस्थळी जिल्हा परिषदेच्यावतीने एचएलएल महालॅबच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
यावेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या दिंडोरी, चांदवड, बागलाण, सुरगाणा, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव आणि इगतपुरी तालुक्यांचा सत्कार श्रीमती मुंडे व श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध पुरस्कारांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

आशा स्वयंसेविका जिल्हास्तरीय पुरस्कार (2016-17) प्रथम- नसिम शेख, माणी (सुरगाणा), द्वितीय- सीता जाधव, कोहोर (पेठ) 2016-17 चे नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार- प्रथम, भारती साळवे प्रा.आ.केंद्र शिंदे (नाशिक), द्वितीय- मनिषा डहाळे प्रा.आ.केंद्र काननवाडी (इगतपुरी), 2016-17 चे आशा गटप्रवर्तक जिल्हास्तरीय पुरस्कार- प्रथम- स्वाती जाधव प्रा.आ.केंद्र खामखेडा (देवळा), द्वितीय- संगीता सदगीर काननवाडी (इगतपुरी), तृतीय- ज्योती जाधव तळेगाव दि.(दिंडोरी)

डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार 2017-18 (उपकेंद्र) प्रथम- प्रा.आ.केंद्र कळवाडी ता.मालेगांव, उपकेंद्र पाडळदे, द्वितीय- प्रा.आ.केंद्र खेड ता.इगतपुरी उपकेंद्र वासाळी, तृतीय- प्रा.आ.केंद्र वावी ता.सिन्नर उपकेंद्र वावी. 2017-18 (प्राथमिक आरोग्य केंद्र) प्रथम- प्रा.आ.केंद्र लोहोणेर ता.देवळा, द्वितीय- प्रा.आ.केंद्र मोहाडी ता.दिंडोरी, तृतीय-प्रा.आ.केंद्र दळवट ता.कळवण

डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारांतर्गत 2017-18 ग्रामीण रुग्णालयासाठीचा प्रथम पुरस्कार ग्रामीण रुग्णालय नांदगावला मिळाला. फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रथम- मीना जाधव अधिपरीचारिका (नांदगांव), प्रथम- इस्टर राठोड एल.एच.व्ही. (नांदगांव) द्वितीय- ए.बी.जाधव एल.एच.व्ही. (सटाणा), तृतीय- रत्ना पवार एल.एच.व्ही. (कळवण), आरोग्यसेविका प्रथम- मनिषा भांगे (सुरगाणा), द्वितीय- शामल अहीरे (इगतपुरी), तृतीय- सविता सानप (मालेगांव)

Advertisement
Advertisement