भंडारा : उमेद अंतर्गत बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात भरविण्यात आली असून या प्रदर्शनीचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी यावेळी उपस्थित होते. बचतगटांच्या उत्पादनासाठी स्वतंत्र विक्री केंद्र निर्माण करण्याचा मानस विधानसभा अध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची त्यांनी पाहणी केली.
उमेद अभियानांतर्गत स्वयं सहाय्यता समूहातील सदस्यानी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी दिवाळीनिमित्त जिल्हा परिषद हॉलमध्ये लावण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिक व समूहातील महिलांचे मनोबल वाढवावे व या ठिकाणी येऊन वस्तूची दिवाळीनिमित्त खरेदी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.
प्रदर्शनी प्रत्येक शुक्रवारी नागरिकांसाठी खुली राहणार आहे. या प्रदर्शनीत दिवाळीनिमित्त विशेष सजावटीचे साहित्य, कोसा पासून तयार केलेले कापड, कोसा साडी, पेपर पासून तयार केलेली खेळणी साहित्य, गावरण शहद, कापडी मास्क, खाद्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधन, वूडन आर्ट, अस्मिता सॅनिटरी पॅडस, ऑर्गनिक भाजीपाला इत्यादीचा समावेश आहे. या आणि खरेदीचा आनंद घ्या, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हा परिषद सभागृह भडारा येथे दर शुक्रवार ला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत स्वयं बचत गटामार्फत विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी सहाय्यता घेवून त्याचा लाभ व्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सुचनाचे काटेकारपणे पालन व्हावे. कोविड 19 च्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.