Published On : Wed, Jan 3rd, 2018

अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा : ॲड. संजय बालपांडे

Advertisement


नागपूर: अग्नीशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा. घटना सांगून घडत नसतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची सिद्धता ठेवण्यात यावी, असे प्रतिपादन अग्नीशमन विभागाचे सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी केले.

मुंबईमध्ये पब,रेस्टॉरेंटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका अग्नीशमन विभागाद्वारे शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेल मालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (ता.२) अमरावती मार्गावरील साईश्रद्धा लॉन येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर अग्नीशमन समितीचे उपसभापती प्रमोद चिखले, सदस्य राजकुमार शाहू, मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके, हॉटेल ॲण्ड बार असोसिएशनचे अध्यक्ष राजू जयस्वाल, तेजींदरसिंग रेणू, रामू मोटघरे, प्रशांत अहिरकर, रामू वर्धने प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Today's Rate
Mon 16 Dec. 2024
Gold 24 KT 76,900/-
Gold 22 KT 71,500/-
Silver / Kg 89,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना बालपांडे म्हणाले, मुंबईत झालेली घटना दुर्दैवी होती. निष्काळजीपणामुळे व हॉटेल व्यावसायिकाच्या चुकीमुळे ती घटना घडली. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आपण खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. आपल्या दुकानांमध्ये, हॉटेल इमारतीमध्ये अग्नीशमन उपकरणे तातडीने बसविण्यात यावीत. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सर्वांना बंधनकारक आहे. ते प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. कायद्याची अंमलबजावणी स्वःतापासून सुरू करण्यात यावी, आपल्या सुरक्षेसाठी व येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.


कार्यशाळेत बोलताना राजेंद्र उचके म्हणाले, अग्नीशमन अधिनियमानुसार ज्या व्यावसायिक इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा जास्त आहे व बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा जास्त आहे, अशा सर्व इमारतींना वा वास्तुला अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे कायद्याने बंधनकारक आहे. हॉटेलमधील अग्निशमन उपकरणे ही सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवण्यात यावी. हॉटेलमधील डीप फ्रिजर, ओव्हन, विद्युत यंत्रे ही तपासून घ्यावी, त्यावर सातत्याने लक्ष द्यावे, ज्वलनशील पदार्थाचा वापर हॉटेलमध्ये टाळावा, अशा सूचना राजेंद्र उचके यांनी केल्या. हॉटेलमध्ये धुम्रपान करू देऊ नये, स्मोकिंग झोन स्वतंत्र असावे, अग्नीशमन विभागाद्वारे जनजागृती सप्ताह करण्यात येतो. आपणही हे प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावे, असे सूचित केले.

यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आगीवर कसे नियंत्रण करण्यात येते याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी राजेंद्र दुबे, आपत्ती व्यवस्थापन सुनील राऊत, कार्यकारी स्थानाधिकारी के.आर.कोठे, पी.एन.कावळे, सुनील डोकरे, अजय लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement