मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला. नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, ‘बेंचमार्क’ निर्णय देऊ. प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे. इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली, अशा शब्दात ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला.
सामनाच्या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले की, शिवसेनेचे बेइमान आमदार आधी सुरतला गेले, तेथून गुवाहटी. नंतर गोवा व शेवटी मुंबईत परतले. हे पक्षविरोधी कारवाईचे टोकच आहे. विधिमंडळात त्यांनी पक्षाचा आदेश मोडला. ‘आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळ्याशी भाजपाचा संबंध नाही. महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही!, असा इशारा नार्वेकरांना देण्यात आला.
देशात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्द्घाटनाचे दिवे पेटवण्याची जोरदार तयारी सुरू असताना महाराष्ट्रात मात्र लोकशाहीचे दिवे विझवले गेले आहेत.
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दोन राजकीय विधाने केली. – गद्दार आमदारांनी भाजपाशी संधान बांधले हे खरे नाही व फुटीर आमदारांनी कोणताही शिस्तभंग केला नाही, पक्षविरोधी कारवाया केल्या नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या निकालपत्रातच हे सांगितले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या की नाहीत हे त्या पक्षाचे प्रमुख ठरवतील. विधानसभा अध्यक्षांना तो अधिकार कोणी दिला? शिवसेना हा पक्ष म्हणजे ठाण्याच्या नाक्यावरची पानटपरी नाही की कोणीही ऐऱ्यागैऱ्याने जाऊन त्याचा बेकायदेशीरपणे ताबा घ्यावा,असे म्हणत ठाकरे गटाने नार्वेकरांवर खडेबोल सुनावले.