नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. सुरेश भट सभागृहात राहूल गांधी संविधान संमेलनाला मार्गदर्शन करताना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.
देशातील सर्व संस्था, निवडणुका,निवडणूक आयोग, शिक्षण संस्था, प्राथमिक, माध्यमिक सर्व शिक्षण, आरोग्याच्या सुविधा हे संविधान देते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक थेट संविधानावर आक्रमण करत नाही. त्यांनी समोरून जर थेट संविधानावर हल्ला केला तर दोन मिनीटात हरतील. त्यांना माहिती आहे की संविधानावर समोरून हल्ला केला तर आपण टीकू शकणार नाही. त्यामुळे छुप्या मार्गाने ते संविधानावर हल्ला करतात. विकास, प्रगती, राष्ट्रवाद अशा शब्दांचा आधार घेऊन संविधानावर हल्ला करतात. मात्र, त्यांच्या दम नाही, हिंमत नाही म्हणून असा छुपा वार करतात.
संविधानात सर्व धर्माचा आदर, समान अधिकार हेच बोलले आहेत. संघ आणि भाजपचे लोक जेव्हा संविधानावर आक्रमण करतात तेव्हा ते केवळ यावर हल्ला करत नाही तर देशातील कोट्यवधी जनतेच्या आवाजावर हल्ला करतात, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.
नागपुरात दाखल होताच दीक्षाभूमीला दिली भेट-
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, राहुल यांनी ‘दीक्षाभूमी’ ला भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे आपल्या हजारो अनुयायांसह, प्रामुख्याने दलितांसह बौद्ध धर्म स्वीकारला.