नागपूर : कुख्यात गुंडाने धंतोलीतील मधूर वाईन शॉपवर हल्ला करून तोडफोड केली. त्याने तेथील व्यवस्थापकावरही तलवारीने हल्ला केला. प्रसंगावधान राखत व्यवस्थापकाने खाली मान घातल्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे वाईन शॉपमध्ये काही वेळ दहशत निर्माण झाली होती.
आकाश पुंडलिक ताकसांडे (वय ३०) असे या गुंडाचे नाव असून तो तकिया धंतोलीत राहतो. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास तो लोकमत चौकाजवळच्या मधूर वाईन शॉपमध्ये आला. त्याच्या हातात तलवार होती. त्याने तेथे मोफत दारूची बाटली मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी ताकसांडेने तोडफोड सुरू केली. व्यवस्थापक शेखर आत्मारामजी सोनकुसरे (वय ४०, रा. लक्ष्मी डेकोरेशन लालगंज) यांना अश्लील शिवीगाळ केली.
सोनकुसरे यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने सोनकुसरेने यांच्या गळ्यावर तलवार मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सोनकुसरे पटकन खाली बसल्यामुळे तलवार हवेत फिरली अन् सोनकुसरेंचा जीव वाचला. यानंतर आरोपीने वाईन शॉपमध्ये तोडफोड केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. वाईन शॉपच्या कर्मचाऱ्यांनी धंतोली पोलिसांना कळविले. पोलिसांचे पथक तेथे पोहचले. त्यांनी आरोपी ताकसांडेला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपी ताकसांडे हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे धंतोली पोलीस सांगतात.