नागपूर: बंदिजनांना हक्क व अधिकार आहेत. त्याचा योग्य वापर त्यांनी करावा. तसेच कायद्यातील जामीनाची तरतूद व फिर्यादी सोबत वाटाघाटी याबाबतची सविस्तर माहिती मिळून त्यांच्यामध्ये जागृती व्हावी. याकरीता विधी व सेवा प्राधिकरणाव्दारे वेळोवेळी शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व न्यायाधीश कुणाल जाधव यांनी केले.
मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिजनांसाठी विधी साक्षरता शिबिराचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्रधिकरणचे सदस्य ॲड. आर जे. राठी, ॲड. सुरेखा बोरकुटे, श्रीमती एस. आर. गायकवाड, मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निगोट, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिराशे, तुरुंगाधिकारी वसंत वानखेडे उपस्थित होते.
विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी कैद्यांना माहिती व्हावी. तसेच तुरुंगामध्ये कैद्यांना हक्क व अधिकार असून त्याविषयी त्यांना माहिती होणे महत्वाचे आहे. त्यांनी त्याचा उपयोग कायद्याच्या चौकटीत राहून करावा. तसेच गुन्हेगाराला एखाद्या गुन्ह्यासाठी झालेल्या शिक्षेबाबत फिर्यादीसोबत वाटाघाटी करुन शिक्षा कमी करता येऊ शकते. कैदयांनी वाटाघाटीचा उपयोग करुन शिक्षा उपभोगून समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून पुढील आयुष्य जगावे, असे कुणाल जाधव यांनी सांगितले.
वैचारीक व मानसिक बदल घडून समाजामध्ये सुयोग्य आचरण करण्यासाठी कैद्यांना शिक्षा देण्यात येते. कैद्यांनी स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून शिक्षा संपल्यानंतर समाजामध्ये चांगले जीवन जगावे, असेही सचिव कुणाल जाधव यांनी यावेळी सांगितले.
वकील नेमण्यासाठी व आर्थिक दंड भरण्यासाठी पुरेशी आर्थिकस्थिती नसणाऱ्या कैद्यांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलाची नियुक्ती करण्यात येते. तसेच त्यांचे इतर हक्क व अधिकारांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कामकाज या विषयावर बोलतांना ॲड. आर. जे. राठी म्हणाले.
बंदिजनांना संचित रजा, अभिवाचन रजा, शिक्षण, आरोग्य, वकिलांशी बोलणे यासारखे अधिकार असून त्यांना पूर्णपणे देण्यात येतात. तसेच कैद्यांमधून शिक्षित असलेल्या कैद्यांना बंदिशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात येते. त्यांच्यामार्फत इतर बंदिजनांना शिक्षण देण्यात येते, असे सांगत ॲङ सुरेखा बोरकुटे यांनी बंद्यांचे हक्क या विषयावर बंदीजनांना मार्गदर्शन केले. तसेच तुरुंगातील नियमांचे पालन करुन योग्य वर्तन अवलंबविले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनील निगोट यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन मध्यवर्ती कारागृहाचे शिक्षक योगेश पाटील यांनी केले.