Published On : Mon, Aug 23rd, 2021
By Nagpur Today Nagpur News

वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या संशोधनासाठी देहदान अत्यावश्यक

Advertisement

‘अवयवदान संवाद’ फेसबुक लाईव्हमध्ये तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर: अवयवदान आणि देहदान याबाबत आपल्या समाजात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती नाही. त्यामुळे आपले अमूल्य शरीर मृत्यूनंतर जाळले, पुरले किंवा अनेक भागात नदीमध्ये सोडले जाते. अवयव दानामुळे आठ व्यक्तींना जीवनदान मिळते तर देहदानामुळे वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होतो. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासाठी अनेक महत्वाचे संशोधन आवश्यक आहेत आणि या संशोधनांकरिता देहदान अत्यावश्यक आहे. त्यामुळे देहदानासाठी प्रत्येकाने ‘संकल्पअर्ज’ भरावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) शरीर रचना शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.कीर्ती नेमाडे एम्सचे शरीर रचना शास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.एम.तारणेकर यांनी केले.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अवयवदान जनजागृती सप्ताहानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सोमवारी (ता. २३) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) शरीर रचना शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.कीर्ती नेमाडे एम्सचे शरीर रचना शास्त्र विभागप्रमुख डॉ. ए.एम.तारणेकर यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी ‘देहदान महादान’ या विषयावर संवाद साधला आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

नैसर्गिक मृत्यूनंतर आपले शरीर जाळून, पुरून अथवा नदीत सोडून देण्याऐवजी ते वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षण व संशोधनाकरिता दान देणे म्हणजे देहदान. देहदानानंतर मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून मानवी शरीराची रचना शिकविली जाते. देहदानाचा वैद्यकीय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो. देहदानाला जात, धर्म, लिंग, भाषा असे कुठलेही बंधन नाही. यासाठी फक्त इच्छा ही एवढीच अट आहे. इच्छा असेल तरच देहदान करता येउ शकते. व्यक्ती हयात असाताना त्याने स्वेच्छेने ‘देहदान संकल्प अर्ज’ भरणे किंवा तो हयात नसताना त्याच्या नातेवाईकाने देहदानाची इच्छा व्यक्त करणे ही बाब यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. मात्र यासाठी खंबीर निर्धार महत्वाचा असतो. एखादी व्यक्ती जीवंत असतानाच देहदानाचा संकल्प करते. मात्र त्याच्या मृत्यूनंतर घरातील नातेवाईक देहदानाबाबत ठोस निर्णय घेउ शकत नाही. अनेकांचे एकमत होत नाही. त्यामुळे यामध्ये अडचणी येतात. घरातील महत्वाच्या व्यक्तीची त्यासाठी संमती महत्वाची असते. त्यामुळे ठोस निर्धार यासाठी महत्वाचा आहे, असेही डॉ.कीर्ती नेमाडे आणि डॉ. ए.एम. तारणेकर म्हणाले.

कुठे करायचा ‘संकल्प अर्ज’
देहदानाची इच्छा असणा-यांना अर्ज कुठे करायचा हा प्रश्न असतो. याबाबत माहिती देताना डॉ.कीर्ती नेमाडे आणि डॉ. ए.एम. तारणेकर यांनी सांगितले, आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयातील शरीर रचना शास्त्र विभागात अर्ज मिळू शकतो किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करता येतो. नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र, मृतकाचे कायदेशीर नातेवाईक व दोन साक्षीदार या सर्वांचे ओळखपत्र, देहदानासाठी मृतकाने आधी अर्ज केले असल्यास त्याची प्रत, नातेवाईकांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली असल्यास त्याचे संमतीपत्र व त्यावर दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आदी कागदपत्रांसह जवळच्या रुग्णालयातील शरीर रचना शास्त्र विभागामध्ये अर्ज जमा करावा लागतो.

देहदानासाठी अटी
देहदानासाठी काही अटी सुद्धा असल्याचे दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले, त्यानुसार देहदानासाठी नैसर्गिक मृत्यूच आवश्यक आहे. त्यासाठी नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. ते नसल्यास देहदान करता येउ शकत नाही. विशिष्ट संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला असल्यासही देहदान करता येत नाही. नेत्र व त्वचा दान केलेल्या मृतदेहाचे देहदान करता येते अन्य कुठल्याही अवयवदान केलेल्या मृतदेहाचे देहदान करता येत नाही.

Advertisement