मुख्यमंत्र्यांकडून मनपा आयुक्तांनी स्वीकारला पुरस्कार
नागपूर: राज्य शासनातर्फे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचा द्वितीय पुरस्कार नागरी सेवा दिनी बुधवारी (ता.२०) नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. बुधवारी (ता.२०) नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनपा आयुक्त व प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मंचावर मा. महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, मा. वस्त्रोद्योग मंत्री श्री. असलम शेख, मा. खासदार श्री. अरविंद सावंत व मा. मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारताना मनपातर्फे उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री. स्वप्नील लोखंडे उपस्थित होते.
राज्य शासनातर्फे ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत २०२१-२२ साठी राज्यातील विविध कार्यालये, विभाग, महानगरपालिका यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी टॅक्स मॉनिटरिंग अॅपची संकल्पना मांडली होती. राज्य शासनातर्फे राज्यस्तर महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेला ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ विकसित करून मनपाच्या कर संकलनामध्ये गतिशीलता आणणे व मालमत्ता निहाय सर्व अचूक माहिती त्वरित उपलब्ध होणे या उपक्रमाकरिता ‘द्वितीय पारितोषिक’ देण्यात आले. ६ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा १८ एप्रिल रोजी करण्यात आली होती. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ या संकल्पनेला द्वितीय पुरस्कार मिळाला.
शहराचा दौरा करताना मनपाच्या अधिकाऱ्यांना ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ ची मदत होत असते. शंभर मीटरच्या Radial अंतरामधील मालमत्तांकरिता वास्तविक डाटाच्या आधारे मालमत्ता कर निर्धारण झालेले आहे किंवा नाही, करदात्याने कर कधी भरला, कोणत्या मिळकतीकरीता किती वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे, त्याच वेळी कर दात्याला मालमत्ता कर जमा करावयाचा असल्याचा कर संग्राहक संबंधित व्यक्तीकडून मालमत्ता कर जमा करून घेऊन शकतो, अशा प्रकारची सर्व माहिती मोक्यावरच अधिकाऱ्यांना प्राप्त होते. या सर्व बाबिंचा विचार करता ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ मुळे मनपा प्रशासनाच्या तसेच कर विभागाच्या कामात गतिशीलता आलेली असून काम पारदर्शक झालेले आहे.