मुंबई: ग्राहक संघटित नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते. प्रत्येकाने आपल्या हक्काची आणि कायद्याची माहिती ठेवणे आवश्यक असून जागरुक ग्राहक ही काळाची गरज आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैध मापनशास्त्र यंत्रणा व शिधावाटप विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्राहक प्रबोधन कार्यक्रम आणि वजन मापे ग्राहक विषयक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात श्री.बापट बोलत होते.
यावेळी अध्यक्ष ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे, राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती ए.पी.भंगाळे, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नियंत्रक दिलीप शिंदे, अपर पोलिस नियंत्रक वैध मापन शास्त्र अमिताभ गुप्ता, आयएसजी संस्थेचे संचालक ईवान कास्तेलिनी आदी उपस्थित होते.यावेळी मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते कंज्युमर कनेक्ट ॲपचे लोकापर्णही करण्यात आले.
श्री. बापट म्हणाले, ग्राहकांचे प्रबोधन महत्त्वाचे असून त्यामुळे ग्राहकांच्या होणाऱ्या संभाव्य फसवणुकीला आळा बसणार आहे. दैनंदिन जीवनात होणाऱ्या गैरप्रकारांबाबत ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर त्यावर योग्य वेळेत कारवाई करणे आणि त्यांचे समाधन करणे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचे मुख्य कर्तव्य आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
अरुण देशपांडे म्हणाले, भविष्याचा विचार करुन ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी. सोबत स्वत:च्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. एक सुजाण नागरिक म्हणून जेवढी पाहिजे तेवढीच खरेदी करावी त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही.
यावेळी बोलताना प्रधान सचिव श्री.पाठक यांनी विभागामार्फत ग्राहक जागृतीसाठी चालविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. तसेच ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करताना दक्षता बाळगावी, असे आवाहनही केले.