नागपूर :- बालकांसाठी घातक ठरू शकणारी तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिसबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकतीच लगतच्या फेटरी येथे जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
संभाव्य कोरोना लाटेच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांना दूर ठेवण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा तयार केलेला आहे. प्रकल्प संचालक विवेक ईलमे आणि खंडविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी काल (दि.1 जून) आरोग्य सेवक-सेविका, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या अध्यक्ष-सचिव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सुज्ञ नागरिकांना कोरोना काळात व त्यानंतर करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. सर्दी-खोकला, ताप, जिभेला चव नसणे यासारखी कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला द्यावा.
पॉझिटीव्ह आढळल्यास बाधिताची ऑक्सीमिटरने ऑक्सिजन पातळी मोजावी. ऑक्सिजन पातळी 94 च्या कमी आढळल्यास त्या बाधिताला रुग्णालयात भरती करावे. पॉझिटीव्ह आढळलेल्या परंतु ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा जास्त असलेल्या बाधिताला गृह (होम) ऐवजी संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल) विलगीकरणात (क्वॉरंटाईन) पाठविण्यात यावे. मधुमेहग्रस्त कोरोना रुग्णांच्या नियमित तपासण्या करण्यात याव्या. कोरोनातून बरे झालेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता बघता काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे कार्यशाळेत तज्ज्ञांद्वारे सुचविण्यात आले.
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. या पार्श्वभूमीवर बालकांना आवश्यक खबरदारी घेण्यास सांगावे. घराबाहेर न पडणे, मास्क घालणे, वारंवार हात धुवून स्वच्छ करणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी सवयी बालकांना लावण्याच्या सूचना उपस्थितांना यावेळी दिली.
या संभाव्य धोक्याबद्दल जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रा. पं. च्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य प्रीती अखंड, सरपंच धनश्री ढोमणे, ग्रा. पं. सदस्य प्रशांत पवार आणि माया हरबडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ सुभाष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक नरेश मट्टामी यांनी तर, आभार प्रदर्शन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मुकेश ढोमणे यांनी केले.