नागपूर : बहुचर्चित कुश कटारिया खून प्रकरणातील आरोपी आयुष पुगलिया याला मध्यवर्ती कारागृहात ठार मारणारा सूरज विशेष कोटनाके (२३) याला खुनाच्या पहिल्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. सरकार पक्षाला कोटनाकेविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आले.
कोटनाके विसापूर, ता. राजुरा येथील रहिवासी आहे. २ डिसेंबर २०१५ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने कोटनाकेला बापुराव कुमरे याच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कोटनाके व पुगलिया हे दोघेही नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यांची चांगली मैत्री होती. दरम्यान, त्यांचा काही कारणावरून वाद झाला. त्यातून ११ सप्टेंबर २०१७ रोजी कोटनाकेने पुगलियाचा फरशी डोक्यावर मारून व कटनीने गळा चिरून खून केला. या प्रकरणात कोटनाकेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले असून ते प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. कोटनाके खुनाच्या पहिल्या प्रकरणातून निर्दोष सुटला असला तरी, पुगलियाच्या खून प्रकरणात त्याला कारागृहातच रहावे लागणार आहे.
कुमरेचा खून ६ मार्च २०१४ रोजी झाला होता. कोटनाके व कुमरे एका अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. स्मशानभूमीकडे जाताना दोघेही एका ठिकाणी थांबले. तेव्हापासून कुमरे बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी परिसरातील नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला होता. दगड डोक्यावर मारून त्याचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणात सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध कोटनाकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. कोटनाकेतर्फे अॅड. एन. ए. बदर यांनी बाजू मांडली.