मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत पुन्हा आढावा घेऊन सुधारित कृती आराखडा तयार करावा. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तिथेच पाणीटंचाईअंतर्गत उपाययोजना करुन पाणीपुरवठा करावा, असे निर्देश पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
गोंदिया जिल्ह्यातील विविध विषयांबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, गोपालदास अग्रवाल, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव एम.बी. सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दयानिधी आदी उपस्थित होते.
श्री. लोणीकर म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील पाणीटंचाईबाबत आमदार यांच्या अध्यक्षतेखालील आमसभेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी यांना आमंत्रित करुन गावपातळीवरच्या पाणीटंचाईच्या समस्या जाणून घ्याव्यात.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या योजना तातडीने सुरु करा. तसेच योजनेतून किती कामे झाली, त्या योजना सुरु झाल्या आहे की नाही, यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे निर्देशही यावेळी दिले. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील टंचाई कृती आराखडा, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, सुजल निर्मल अभियान, गोंदिया जिल्ह्यात मजीप्रा व पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद येथील पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती,आदी विषयांचा यावेळी श्री. लोणीकर यांनी आढावा घेतला. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्याची दखल घेत मंत्री श्री. लोणीकर यांनी या बैठकीचे आयोजन केले.