Published On : Thu, Oct 5th, 2023

नागपूरच्या गांधीबाग परिसरात ‘बबली गॅंग’ सक्रिय ; व्यापाऱ्याच्या बॅगेतून पाच जणींनी लंपास केले पाच लाख !

Advertisement

नागपूर : शहरातील इतवारीच्या गांधीबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर होलसेल मालाची दुकाने असून याठिकाणी नेहमी ग्राहकांची वर्दळ असते. अनेकदा या परिसरात चोरीच्या घटना घडतात. मात्र या परिसरात आता चोरी करणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय झाली आहे.

नुकतेच पाच महिलांच्या टोळीने एका होलसेल भांडेविक्रेत्याच्या काऊंटरवरून साडेचार लाख रुपयांची रोकड उडविली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.भुपेंद्र वासवानी (४५) यांचे गांधीबागेत समाधान सेल्स नावाचे होलसेल भांड्यांचे दुकान आहे.

Advertisement

२९ सप्टेंबर रोजी त्यांना मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून साडेचार लाख रुपये रोख रक्कम घ्यायची होती. संबंधित व्यापारी दुपारच्या सुमारास त्यांच्या दुकानात आला व त्याने त्यांच्या काऊंटरवर पैशांची बॅग ठेवली. तो लघुशंकेसाठी गेला. त्याचवेळी दुकानात पाच महिला भांडे घेण्यासाठी आल्या.

त्यामुळे वासवानी यांनी त्यांना भांडी दाखविण्यास सुरुवात केली व त्यांचे बॅगेकडे दुर्लक्ष झाले. संबंधित व्यापारी लघुशंका करून परत आल्यावर त्याने काऊंटरवरून बॅग उचलली व पैसे देण्यासाठी चेन उघडली. मात्र त्यात पैसे नव्हते. हे पाहून दोघांनाही धक्का बसला.

वासवानी यांनी सीसीटीव्ही तपासले असता पाच महिलांपैकी एका महिलेने बॅगेतून पैसे काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वासवानी यांनी याप्रकरणी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पाचही अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे.