नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे बर्डी ते बहादुरागाव आणि बर्डी ते चिखली अशा दोन शहर बस सेवेचा शुभारंभ मंगळवारी (ता. २९) करण्यात आला.
बर्डी ते बहादुरागाव मार्गे अयाचित मंदिर, रमणा मारोती, खरबी चौक, सुंदर नगर या बसचा शुभारंभ कार्यक्रम गरीब नवाज चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बहादुराचे सरपंच राजकुमार वंजारी, माजी सरपंच नरेंद्र नांदुरकर, राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी दत्त, दिलीप चाफेकर यांची उपस्थिती होती. मनपाचे रामराव मातकर, डिम्टसचे सुनील पशिने, डेपो मॅनेजर सिद्धार्थ गजभिये व परिसरातील ज्येष्ठ नागरिकही यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी सुरू असलेल्या बर्डी-शिवनी बसचा विस्तार चिखलीपर्यंत करण्यात आला. या नव्या सेवेचा शुभारंभ कार्यक्रम चिखली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच सुनंदा लांजेवार, जि.प. सदस्य विनोद पाटील, शिवनीचे सरपंच भगवान कोरडे, मनपाचे रामराव मातकर, डिम्टस्चे सुनील पशिने, डेपो मॅनेजर सिद्धार्थ गजभिये उपस्थित होते.
बर्डी-बहादुरागाव बससाठी रश्मी दत्त आणि नरेंद्र नांदुरकर तर बर्डी-चिखली बससाठी जि.प. सदस्य विनोद पाटील यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या मागणीची दखल घेत त्यांनी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांना सदर सेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर दोन्ही सेवा सुरू करण्यात आला. परिसरातील जनतेने या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.