नागपूर :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाचा आकाश आनंद यांची नागपूरसह महाराष्ट्रात चार सभा होणार आहेत. नागपुरात येत्या १७ नोव्हेंबरला सुरेश भट सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.आकाश आनंद यांच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे मंगळवारी विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
मायावती यांचे उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्याकडे बघितले जात असून त्यांच्या या दौऱ्याने बसपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आकाश आनंद यांच्या होणाऱ्या सभा – १७ नोव्हेंबरला नागपुरात, २३ ला पुणे येथे, २९ ला औरंगाबाद व ६ डिसेंबरला मुंबई येथे सभा होईल. यानंतर डिसेंबरमध्ये बसपा प्रमुख मायावती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत अहेत, असे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी सांगितले.