छत्रपती संभाजीनगर : औरंगजेबाच्या कबरवरून राजकीय वातावरण तापले आहे. औरंगजेबाची कबर गुलामगिरी, लाचारी व अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी, अन्यथा हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल व आवश्यकता भासल्यास चक्काजाम व कारसेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल, असा इशारा हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे यांनी पुण्यात संयुक्त पत्रपरिषदेत दिला.
कबर हटवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच दिवशी आंदोलन करण्यात येत आहे. तिथीप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सोमवारी सकाळी ११:३० वाजता पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले जाईल, अशी माहिती विहिंपने दिली.
या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क आहे.
औरंगजेबाची ही कबर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने पोलिसांबरोबरच पुरातत्त्व विभागानेही कर्मचारी तैनात केले आहे.
एसआरपीएफचे ११५ शस्त्रधारी जवान, दंगल नियंत्रण पथकाच्या २५ पोलिस जवानांसह ६० पोलिस अंमलदार नियुक्त केले आहेत. कबर परिसरात जाताना २ ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे. कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे.