मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून जोशी यांची ओळख होती. ते महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते.गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ICUमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.शुक्रवारी दुपारी नंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान सामाजिक सेवेच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
जोशी यांचा राजकीय प्रवास...
– 2 वेळा नगरसेवक
– 3 वेळा विधानपरिषद सदस्य
– मुंबई महानगरपालिका महापौर (1976 -77)
– 2 वेळा विधानसभा सदस्य विरोधी पक्षनेता
– विधानसभा (1990- 91)
-मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य (1995-99)
– केंद्रीय मंत्री (अवजड आणि सार्वजनिक उद्योग खाते)
– लोकसभा अध्यक्ष (1999- 2002) राज्यसभा खासदार (2002-2004)