मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे कायमच त्यांच्या भाषणात हा मुद्दा मांडतात की त्यांनी शिवसेना सोडली पण फोडाफोडी केली नाही. नवा पक्ष स्थापन केला. आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी होत असल्याचा आरोप केला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच ले आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंच्या मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत यांनी आज निवडणूक आयोग हे सरकारच्या ताटाखालची मांजर आहे,अशी टीका केली.
सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारले असल्याचे राऊत म्हणाले.
शरद पवारांच्या आमदारांना, खासदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तरीही यात देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मुखवटे गळून पडत आहेत. तुमच्याही तिरड्या राजकारणातून उचलल्या जाणार आहेत कधीतरी हे विसरु नका.
एकनाथ शिंदेंनी त्यांच्या संपर्कात कोण आहेत? ती नावं जाहीर करावीत. आज त्यांच्याकडे सत्ता आहे. दिल्लीत राक्षस बसले आहेत. ईडी, सीबीआय त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ही फोडाफोडी सुरु असल्याचे राऊत म्हणाले.