सय्यद अहमद यांना स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार प्रदान
नागपूर: वनविभागाचे किचकट नियमांमुळे बांबू तोडणी करणे शक्य नाही. पण बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि पर्यावरणाची काळजी घेत त्यावर आधारित उद्योग सुरू केले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्व. उत्तमराव पाटील हे महाराष्ट्राचे पहिले प्रधान मुख्य वनसंरक्षक होते. विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे पुण्यातील वनसंरक्षक कार्यालय नागपुरात आणण्याचे त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अतिशय शांत व शिस्तप्रिय अशा उत्तमराव पाटील यांच्या स्मरणार्थ वनराई फाउंडेशन नागपूर व महाराष्ट्र राज्य वनसंरक्षक व पदोन्नत संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार दिला जातो. मंगळवारी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या सोहळ्यात वनांच्या संदर्भात व विशेषत: बांबू लागवडीच्या संदर्भात विशेष उल्लेखनीय कार्य करणारे वनक्षेत्र अधिकारी सय्यद सलीम अहमद यांचा 21 हजार रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एन. रामबाबू व वनराई फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अनिस अहमद होते.
अमरावतीमध्ये बांबू उद्यानाची निर्मिती करणा-या सय्यद अहमद यांच्या कार्याचे नितीन गडकरी यांनी कौतूक केले. अगरबत्ती, आइस्क्रीम चमचे इत्यादीसाठी चीनमधून आतापर्यत बांबू मागावला जात होता. पण आता मेड इन इंडिया, मेक इन इंडियाचा धोरण स्वीकारण्याची वेळ आली असून भारतातच मोठ्या प्रमाणात बांबू उत्पादन वाढवले गेले पाहिजे. बांबूपासून लोणचे, कापड, टाईल्स, फर्निचर, वीज, चारकोल, इथॅनॉल, विमानाचे इंधन, जहाजाचे इंधन, साड्या तयार केल्या जाऊ शकतात. त्यावर संशोधन होणे गरजेचे असून विविध उत्पादनांचे उत्कृष्ट डिझाईन करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
डॉ. एन. रामबाबू यांनी सय्यद अहमद यांच्या बांबू क्षेत्रातील कार्याचा आढावा घेताना ते शिकार प्रतिबंधक क्षेत्रातही उत्तम कार्य करीत असल्याचे सांगितले. अनिस अहमद यांनी पर्यावरण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या गिरीश गांधी यांना पद्मभूषण पुरस्कार दिला जावा, अशी मागणी केली. सय्यद अहमद यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे इतरांनाही प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.
बांबू क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य करणा-या नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार मिळत असल्यामुळे सय्यद अहमद भाग्यशाली ठरले आहेत, असे डॉ. गिरीश गांधी प्रास्ताविकात म्हणाले. उत्तमराव पाटील अतिशय प्रामाणिक अधिकारी होते. त्यांनी वन कार्यालयाला शिस्त लावली, तेथील कार्यप्रणालीत सकारात्मक बदल घडवून आणले, असेही ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना सय्यद अहमद यांनी आयोजकांचे आभार मानले. बांबूचे फायदे सांगताना त्यांनी या क्षेत्रात केलेल्या अभ्यास व कार्याचा आढावा घेतला. अमरावती येथील बांबू उद्यानाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सत्कारमूर्तींचा परिचय महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे अध्यक्ष व आयोजक अजय पाटील यांनी करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. पिनाक दंदे यांनी केले.
वनविभागाने कायदा बदलावावनविभागाने पर्यावरणाच्या दृष्टीने जरी कायदे तयार झाले असले तरी आतापर्यंत बांबू तोडू न दिल्यामुळे देशाचे, आदिवासींचे मोठे नुकसान झाले आहे. पर्यावरण रक्षण करतानाचाच बांबूची लागवड केली, व्यावसायिक उपयोग वाढवला तर रोजगार निर्मिती होईल व अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल. त्यासाठी वनविभागाने बांबूसंदर्भातील नियम बदलावे, असे नितीन गडकरी म्हणाले
.
तर बांबू क्षेत्रात क्रांती होईल
सय्यद अहमद यांनी अमरावतीच्या बांबू उद्यानात 170 प्रजाती जतन केल्या आहेत. त्यांच्या कशासाठी उपयोग होऊ शकतो, हे शोधण्यासोबतच त्यांनी अरुणाचल, त्रिपुरा, मिझोराम, चीन इत्यादी ठिकाणच्या सुमारे 350 बांबूच्या प्रजाती येथे आणाव्या. त्यासाठी त्यांनी टाटा ट्रस्टला प्रपोजल द्यावे. डॉ. रामबाबू यांनी नियम बदलण्याच्या दृष्टीने विचार करावा, बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड करावी. त्यासाठी लागणारी सर्व मदत सरकार करायला तयार आहे. असे झाले तर बांबू क्षेत्रात क्रांती होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.