नागपूर: मुदत संपलेले पासपोर्ट आणि मुदतबाहय विझा बाळगून भारतात प्रवेश केल्याप्रकरणी एका बांगलादेशी तरुणीविरुद्ध लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने तिची कारागृहात रवानगी करण्यात आली.
रबिया आयबाली खान (२६, रा. कोलारुवा, बांगलादेश) असे अटकेतील तरुणीचे नाव आहे. ती ३१ मे २०१७ रोजी मुंबई ते हावडा असा प्रवास करीत होती. त्याच बोगीत नागपुरच्या चंद्रमणी नगरातील किरण आनंद मेश्राम (२१) ही तरुणी प्रवास करीत होती. रबियाकडे पासपोर्ट नसून ती अडचणीत असल्याचे किरणला समजले. किरण तिची मदत करण्याच्या प्रयत्नात होती.
दुपारी १४.१५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबली असता किरणने तिला लोहमार्ग पोलिसांकडे आणले. पोलिसांनी सखोल चौकशीअंती तिची महिला सुधारगृहात रवानगी केली. जवळपास साडेतीन महिने ती सुधारगृहात होती. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर रबिया यांच्याकडे असलेला पासपोर्ट आणि विझा हा मुदतबाहय असल्याचे आढळले. लोहमार्ग पोलिसांनी पासपोर्ट एन्ट्री टू इंडिया १९५० सहकलम ३ (अ), ६ (अ) अंतर्गत महिलेविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.