पंढरपूर: महाराष्ट्र बँकेच्या गाडीवर पडलेल्या ७० लाखाच्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. मासाळ यांचा या दरोड्याच्या कटात सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर मासाळ हा जिल्ह्यात अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो. बँकेच्या पैशाची संगनमतानं लूट झाल्यानंतर दरोड्याचा बनाव रचला गेला होता. या कारणावरून बँक व्यवस्थापक अमोल भोसले आणि दरोड्यातील भाऊसाहेब कोळेकर याना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. बँक व्यवस्थापक अमोल भोसले याच्याशी मासाळचे जवळचे संबंध होते. यातूनच ही रोकड लुटण्याचा व तो दरोडा असल्याचं भासवण्याचा कट रचण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपींकडून ३१ लाखाची रोकड जप्त केली असून रात्री उशिरा या दरोड्यातील उर्वरित ३ आरोपीनंही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून लुटीतील उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे.