नागपूर : दिवाळीच्या काळात नागपुरात तब्बल ५०० कोटी रुपयांहून जास्तची उलाढाल झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. अगदी छोट्यापासून तर मोठ्या वस्तूंपर्यंत नागरिकांनी खरेदी केली. यात इलेक्ट्राॅनिक वस्तू, वाहने, दागिन्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. एकंदरीत शहरात दोन हजारांच्या जवळपास दुचाकी व एक हजाराच्या जवळपास चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
यादरम्यान सोने-चांदीच्या दागिन्यांचीही विक्रमी विक्री झाल्याचे समोर आले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ग्राहकांनी विविध सराफा दुकानात सकाळपासूनच गर्दी केली होती. इतके नाही तर नागपूरकरांनी फ्रीज, स्मार्ट टीव्ही, मोबाईल, वाॅशिंग मशीनचीही खरेदी केली आहे. अनेक कंपन्यांनी यात ऑफरही दिली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडूच्या फुलांसह इतर फुलांचे दर गगनाला भिडले होते. तरीही नागरिकांनी फुलांची तसेच पूजनाच्या इतर साहित्यांची खरेदी केली आहे.
किरकोळ विक्रेत्यांचाही मोठा फायदा –
यंदा मात्र दिवाळीत बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यादरम्यान किरकोळ विक्रेत्यांचाही मोठा फायदा झाला आहे. हात गाडीवर कपडे विकणारा विक्रेता असो की फुटपाथवर बसून इतर वस्तूंची विक्री करणारे विक्रेता असो या सर्वांचा व्यायसायही चांगलाच झाला आहे.