नागपूर, : अखिल भारतीय समंवयित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय अंतर्गत कुही तालुक्यात शिवनी (किन्ही) येथे जवस व मोहरी पीक शेती दिन कार्यक्रम प्रकल्प प्रमुख व जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जवस व मोहरी या पिकांचे भविष्यातील महत्व सांगून या पिकांच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती दिली.
मोहरी पैदासकार डॉ. संदीप कामडी यांनी मोहरी पीक हे सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये कसे फायदेशीर ठरेल, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक कशाप्रकारे ठरु शकते याबाबत मार्गदर्शन केले. बाहेरील राज्यात मोहरी पिकास मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोहरी पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढवण्याचे आवाहनही केले. यावेळी प्रगतीशिल शेतकरी पुंडलिक राउत, महादेव अतकरी, रामु राउत व इतर शेतकरी उपस्थित होते.
गावातील इतर शेतकऱ्यांनी शेतावर जवस व मोहरी संशोधन प्रकल्पाद्वारे प्रसारीत झालेल्या मोहरीच्या टी.ए.एम. 108-1 या वाणांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या शिफारशीप्रमाणे लागवड केल्यामुळे मोहरीचे उत्कृष्ट पीक अवस्था असल्याचे पाहणी केली.
शेतकऱ्यांना जवस व मोहरी पीक लागवडीच्या घडीपत्रिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संचालन शरद भुरे यांनी तर आभार प्रदर्शन जगदिश पर्बत यांनी केले.