आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकारी व वेकोलीला पत्र
नागपूर : कामठी तालुक्यातील बिना (संगम) नदी काठावर अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली असून प्रवाह थोपविण्याकरिता नदीच्या काठावर युद्धस्तरावर मजबुतीकरण करण्याची गरज आहे. तातडीने येथे पाहणी करून संभाव्य जिवित व मालमत्ता हानी टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे पत्र माजी उर्जामंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी तसेच ‘वेकोली’ला दिले. `
पेंच, कन्हान व कोलार नदीच्या संगमावर बिना गाव वसले आहे. वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणीमुळेही हे गाव बाधित आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये राज्य सरकारने पुनर्वसनाचे आदेश काढूनही पुनर्वसनाची प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे हे गाव धोकादायक स्थितीत आहे. गेल्या पाच दिवसांपासून अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येत असून गावांमध्ये पाणी शिरत आहे.
काठावरील वस्त्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. या गावातही पूराचे पाणी शिरण्याची भीती असून त्यामुळे मोठी जिवित व मालमत्ता हानी होण्याची शक्यता आहे. पूराचे पाणी थोपविण्यासाठी नदीच्या काठावर युद्धस्तरावर मजबुतीकरण करण्याची गरज आहे.
तातडीने येथे पूरपरिस्थितीची पाहणी करावी, वेकोलीलाही पाहणीचे निर्देश द्यावे, अशी सूचना आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. एनडीआरएफची चमू साहित्यासह तैनात करून आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचविले आहे. त्याचवेळी आमदार बावनकुळे यांनी वेकोलीचेही कान टोचले. त्यांनी वेकोलीला पत्रात तातडीने घटनास्थळ पथक निरीक्षणासाठी पाठवून युद्धस्तरावर कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.