नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात येणारा अंतिम टप्प्यातील निधी थांबविण्यात आल्याने घरकुल धारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरनाणे समन्वय साधून तांत्रिक अडचणी सोडवाव्या आणि निधी त्वरित घरकुल धारकांच्या खात्यात वळता करावा अशी मागणी विधान परिषद सदस्य श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद क्षेत्रातील एकूण २३ प्रकल्पांना पंतप्रधान आवास योजनेची केंद्रीय मान्यता आहे. या योजनेचा निधी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सुपूर्द करण्यात येतो.
त्यानंतर तो घरकुल धारकांच्या खात्यात थेट वर्ग होतो. आत्तापर्यंत ५८.७९६ कोटींचा निधी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला वर्ग करण्यात आला असून, अंतिम टप्प्यातील २५५.१०६ कोटींचा निधी वितरीत होऊ न शकल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी लेखी पत्राद्वारे आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे.
महत्वाचे म्हणजे हा निधी वर्ग करण्यासाठी राज्य शासनाच्या धोरणानुसार नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या राष्ट्रीयकृत बँकेतील सिंगल नोडल अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स असणे गरजेचे आहे. तसे नसल्याने हा निधी वर्ग करणे शक्य होण्यास अडचणी येत असल्याचे पत्रात नमूद आहे. राज्य शासनाचा ११ प्रकल्पांसाठीचा १४३.७१ कोटी निधीला मंजुरी देण्यात आली असून हा निधीला मंजुरी प्राप्त आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण व नागपूर महानगर प्रदेश प्राधिकरणाने त्वरित समन्वय साधावा. ही तांत्रिक बाब तात्काळ सोडवून सर्वसामान्यांच्या हक्काचा निधी घरकुल धारकांच्या खात्यात वर्ग करावा अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हा निधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.